बजाजची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर चेतक अखेर आज लाँच झाली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने स्कूटरला अर्बन आणि प्रिमियम अशा 2 व्हेरिएंटमध्ये सादर केले असून, यात सायबर व्हाइट, हेजलन्ट, सिट्रस रश, वॅल्यूटो रोजो, इंडिगो मेटेलिक आणि ब्रुक्लन ब्लॅक हे 6 रंग मिळतील. 15 जानेवारी पासून या स्कूटरची प्री-बुकिंग सुरू होईल, मात्र डिलिव्हरी फेब्रुवारी अखेर केली जाईल.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 किलोवॉटची बॅटरी आणि 4080 वॉट मोटार देण्यात आलेली आहे. ते 16 एनएम टॉर्क जनरेट करते. बॅटरी आणि मोटारला आयपी67 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हे डस्टप्रुफ आणि वॉटरप्रुफ आहे. कंपनीने दावा केला आहे की, 5 तासात स्कूटर फुल चार्ज होईल.
स्कूटरमध्ये ईको आणि स्पोर्ट असे दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आलेले आहेत. फुल चार्जमध्ये ईको मोड 95 किलोमीटर रेंज देते आणि स्पोर्ट मोड 85 किमीपर्यंत चालते. स्कूटर सोबत चार्जर मोफत दिला जाईल. याशिवाय फास्ट डीसी चार्जरला कंपनी तुमच्या घरात मोफत इंस्टॉल करून जाईल.
कंपनीने स्कूटरला रेट्रो लूक दिला आहे. यात राउंड हेडलॅम्प, 12 इंच एलॉय व्हिल आणि सिंगल साइड सस्पेंशन दिले आह. पुर्ण मेटल बॉडी असणारी देशातील पहिली स्कूटर आहे. स्कूटरला कंपनीच्या अॅपसोबत कनेक्ट करता येईल. त्यानंतर रेंज, चार्जिंग, लोकेशन या सारखी महत्त्वाची माहिती फोनवरच मिळेल.
यामध्ये रिव्हर्स ड्रायव्हिंग फीचर देण्यात आलेले आहे. ज्यामुळे उतारावर देखील गाडी सहज मागे घेता येईल. या फीचरमुळे महिलांसाठी ड्रायव्हिंग सोपी होईल. कंपनी यावर 3 वर्ष अथवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटी देत आहे.