चीनमध्ये प्रकोप झालेल्या कोरोना विषाणूचा दणका आता माणसांबरोबर उद्योगाला बसला असून ह्युंदाईने त्यांचा द. कोरियातील उल्सान शहरातला सर्वात मोठा कार उत्पादक प्रकल्प बंद केला आहे. यामुळे २५ हजार कर्मचारी बेरोजगार झाले असून कंपनीने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार दिला जाणार नाही. पाच दिवसात कंपनीचे ३५७ कोटींचे नुकसान झाले असल्याचेही समजते.
उल्सान शहरात ह्युंदाईचा सर्वात मोठा कार उत्पादन प्रकल्प असून येथे दरवर्षी १४ लाखांपेक्षा अधिक गाड्या तयार होतात. या कॉम्प्लेक्स मध्ये पाच कारखाने आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन मधले कार्स साठी सुटे भाग तयार करणारे कारखाने बंद केले गेले आहेत. यामुळे वायरिंग हर्नेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या हर्नेसचा उपयोग क्लिष्ट इलेक्ट्रॉनिक जोडण्यासाठी होतो. यामुळे ह्युदाईला उत्पादन थांबविणे भाग पडले आहे.
ह्युंदाई तिच्या सहयोगी किया मोटर्स सह जगातील पाचवी बडी कार उत्पादक कंपनी आहे. कियानेही त्यांचे तीन प्लांट बंद करत असल्याची घोषणा सोमवारी केली आहे. फ्रांसच्या रेनोने पुढच्या आठवड्यात द.कोरियातील बुसान येथील प्लांट बंद करत असल्याचे संकेत दिले आहेत तर फिआटने युरोप मधील प्लांट बंद होत असल्याचे संकेत दिले आहेत.