एकामागोमाग एक बँक बुडण्याच्याच स्थितीत असताना आता येस बँकेवर देखील आरबीआयने निर्बंध लादले आहेत. येस बँकेची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे की आता त्याला विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. बँकेचे शेअर देखील पडले आहेत.
बँकेच्या शाखा देशभरात पसरलेल्या आहेत. एकेकाळी या बँकेला सर्वाधिक व्याज देणारी बँक म्हणून ओळखले जात असे. येस बँकेचा हा संपुर्ण प्रवास जाणून घेऊया.
येस बँकेची सुरूवात –
या बँकेची सुरूवात 2004 ला राणा कपूर यांनी अशोक कपूर यांच्यासोबत मिळून केली होती. ही देशातील चौथी सर्वात मोठी खाजगी बँक असून, याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. या बँकेच्या देशभरात जवळपास 1000 आणि 1800 एटीएम आहेत. या बँकेची येस ग्रेस नावाने महिलांसाठी स्पेशल शाखा देखील होती. या शाखेत सर्व महिला काम करतात.
सुरूवातीच्या काळात बँक सुरळीत सुरू होती. मात्र मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशोक कपूर यांच्या पत्नी मधू कपूर आणि राणा कपूर यांच्यामध्ये वाद सुरू झाले. दोघांमध्ये बँकेच्या मालकी हक्काबाबत लढाई सुरू झाली. न्यायालयाने या प्रकरणात राणा कपूर यांच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर रणवीर गिल येस बँकेचे एमडी झाले.
एका दशकात ही बँक 3 लाख कोटी रुपये संपत्ती असणारी कंपनी झाली. एकेकाळी तर बँकेचे शेअर 1400 रुपयांपर्यंत पोहचले होते. येस बँक आपल्या बॅलेन्सशीट आणि एनपीएमध्ये काहीतरी घोळ करत असल्याचा संशय आरबीआयला आल्यानंतर येस बँकेवर कारवाई करण्यास सुरूवात झाली.
येस बँक इतरांच्या तुलनेत अधिक व्याज देत असे. यामुळे ही बँके लोकांच्या आवडीची ठरली होती. येस बँकेने अशा अनेक कंपन्यांना कर्ज दिले, ज्यांना इतर बँकेने कर्ज दिले नाही. येस बँकेने ज्या कंपन्यांना कर्ज दिले त्या दिवाळखोरीत गेल्या व त्यांचे एनपीए देखील वाढले.राणा कपूर यांनी 2008 मध्ये भरपूर कर्ज देण्यास सुरूवात केली. त्याचवेळी भारताची आर्थिक स्थिती देखील नाजूक होती. कर्ज दिलेल्या कंपन्या देखील दिवाळखोर झाल्या.
बॅलेन्स शीटमध्ये योग्य माहिती न दिल्याने आरबीआयने राणा कपूर यांना पद सोडण्यास सांगितले. बँक मेसेजिंग सॉफ्टवेअर स्विफ्टचा वापर न केल्याने आरबीआयने येस बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठवला. ऑगस्ट 2019 मध्ये मूडीजने येस बँकेचे रेटिंग देखील कमी केले. राणा कपूर आणि रजत मोंगा यांनी आपले शेअर देखील विकले. आता आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले असून, ग्राहक महिन्याला केवळ 50 हजार रुपयेच काढू शकतात.