जगभरातील देशांना कोविड १९ महामारीने संकटात लोटलेल्या चीनने आता याच विषाणूच्या माध्यमातून कोट्यवधीची कमाई सुरु केली आहे. चीन मध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर तेथील कंपन्या आता प्रचंड प्रमाणावर मास्क बनवू लागल्या असून जगभरात हे मास्क निर्यात केले जात आहेत.
हा व्यवसाय चीन साठी जणू सोन्याची खाण ठरत आहे. अनेक देशात लॉक डाऊन मुळे कारखाने बंद आहेत आणि करोना प्रसारामुळे मोठ्या प्रमाणावर मास्क ना मागणी आहे. याचा थेट फायदा चीनला होताना दिसत आहे.
चीन मध्ये कोविड १९चा प्रसार होत असताना गुआन शून्जे नामक कंपनीने ११ दिवसात मास्क बनविणारी फॅक्टरी सुरु केली आणि काही दिवसात ५ नवे कारखाने सुरु करून एन ९५ मास्क जगभरात निर्यात करायला सुरवात केली. जगभरातून या मास्क ना खूप मागणी आहे. सर्वप्रथम या कंपनीने इटलीला आणि आता संपूर्ण युरोप मध्ये ही निर्यात सुरु केली आहे.
बिझिनेस डेटा प्लॅटफॉर्म तियानयंचा नुसार गेल्या दोन महिन्यात चीन मध्ये मास्क बनविणाऱ्या ८९५० कंपन्या सुरु झाल्या असून दररोज ११.६ कोटी मास्क तयार केले जात आहेत. युरोप, द. कोरिया मधून त्यांना मोठी मागणी आहे. डोंगगुआन येथील मास्क मशीन बनविणाऱ्या कंपनीचे मालक गुआंग्तु यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या व्यवसायात ७० लाख डॉलर्स गुंतविले आहेत आणि ७१ हजार डॉलर्सला एक या प्रमाणे ही मशीन विकली जात आहेत. कंपनीने आत्तापर्यंत ७० मशीन्स विकली असून त्याच्याकडे आणखी २०० मशीन्सची ऑर्डर आहे. मालकाच्या मते एक मास्क बनविणे म्हणजे एक नोट छापणे आहे. यातून प्रचंड कमाई केली जात आहे.