सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी फेसबुकने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडमध्ये 9.99 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 43,574 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाला कर्ज कमी करण्यास मदत होणार आहे. याशिवाय फेसबुकची भारतातील स्थिती अधिक मजबूत होईल.
रिलायन्सने याबाबत माहिती देताना सांगितले की, फेसबुक जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. याद्वारे फेसबुक सर्वात मोठा अल्पांश शेअरधारक होईल. आता या गुंतवणुकीद्वारे फेसबुकडे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे 9.99 टक्के भागभांडवल असेल. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्म्सची एंटरप्राइज वॅल्यू 4.62 लाख कोटी झाली आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची मालकीची सहाय्यक कंपनी आहे. जी अनेक प्रकारच्या डिजिटल सेवा प्रदान करते. याच्या ग्राहकांची संख्या 38.8 कोटींपेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त रिलायन्स कंपनी तेल-रसायन व्यवसायातील 20 टक्के भागीदारी विकण्यासाठी सौदीच्या अरामको कंपनीशी चर्चा करत आहे. पुढील वर्षी पर्यंत कर्जमुक्त होण्याचे समूहाचे लक्ष आहे.