क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ आहे असे बोलले जाते. मैदानावर कोणता संघ कशी कामगिरी करेल हे सांगता येत नाही. अनेकदा आपण एकाच षटकात 6 षटकार लगावल्याचे पाहिले आहे, तर कधी संपूर्ण संघच कमी धावांवर बाद झाल्याचे पाहिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ 6 धावांवर बाद झाल्याचे तुम्ही पाहिले असेल परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा प्रकार झाला तर? हो, असाच एक प्रकार मंगळवारी महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीमध्ये पाहायला मिळाला. येथे महिलांचा संपूर्ण संघ अवघ्या 6 धावांमध्ये बाद झाला.

     आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे ती क्विबुका महिला स्पर्धेत. येथे रवांडाने मालीच्या महिला क्रिकेट संघाला फक्त 6 धावांवर बाद केले. मालीचा संपूर्ण संघ फक्त 9 षटकं मैदानात टिकला आणि त्यांची सलामीची फलंदाज मारिमा समाके हिने एक धाव केली, तर 5 धावा अवांतर होत्या. इतर सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले. तसेच फक्त चार चेंडूत हे लक्ष्य गाठत विक्रम नोंदवला.

     याआधी महिला आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेत सर्वात कमी धावांचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनच्या संघाला युएईने अवघ्या 14 धावांमध्ये गारद केले होते. आता हा नकोसा विक्रम मालीच्या नावावर जमा झाला आहे.


Find out more: