मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट विश्वात अनेक मुद्यांवरून वाद होताना दिसत आहेत. त्यातील एक मुद्दा म्हणजे संघाच्या प्रशिक्षकपदाचा. वाद विवादानंतर अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या निवडीची तारीख निश्चित झाली आहे. 16 ऑगस्टला मुलाखती होणार असून याच दिवशी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माइक हेसन, फिर सिमॉन्स, लालचंद राजपूत आणि रॉबीन सिंग हे शर्यतीत आहेत. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीली त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाचा अंतिम निर्णय घेणार आहे. या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर फिल सिमॉन्स, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉंटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.