भारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वॉसेस्टरच्या न्यू रोड स्टेडियवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 36 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या स्पर्धेत सहा देशांनी सहभाग घेतला होता. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
रवींद्र संतेने 34 चेंडूंत 53 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 20 षटकांत 7 बाद 180 धावांची मजल मारून दिली. रवींद्रला कुणाल फणसे ( 36), कर्णधार विक्रांत केणी ( 29) आणि सुग्नेश महेंदरन ( 33) यांची सुरेख साथ लाभली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 144 धावा करता आल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकात सलामीवीर वमीम खान माघारी परतला. त्यानंतर कर्णधार केणी आणि फणसे यांनी 46 धावांची भागीदारी करत संघाला पुर्वपदावर आणले. हे दोघेही माघारी परतल्यानंतर रवींद्रने 4 षटकार व 2 चौकारांसह अर्धशतक झळकावले. महेंदरननेही चांगली साथ दिली. इंग्लंडलच्या लिएम ओ’ब्रायन याने 35 धावांत 2 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडकडून अँगस ब्राऊन ( 44), कॅलम फ्लान ( 28) आणि विल फ्लान ( 21*) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारताच्या सन्नी गोयत व कुणाल फणसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.