भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका मागोमाग असे विक्रमांचे इमले रचत आहे. सध्या भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता एकदिवसीय मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात मात्र विराट कोहलीने शानदार शतक झळकावीत भारताला विजय मिळवून दिला. या शतकासोबतच त्याने वेस्टइंडिज विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादच्या नावे होता, त्याने वेस्टइंडिज विरुद्ध 1930 धावा केल्या होत्या.
मियांदादचा हा विक्रम 23 वर्ष अबाधित होता, तिथपर्यंत कोणीही पोहचू शकला नव्हता. मियांदादने वेस्टइंडिज विरोधात 64 सामन्यांत 1930 धावा काढल्या होत्या. त्यात एक शतक आणि बारा अर्धशतकांचा समावेश होता. विराटने त्यापेक्षा जवळजवळ निम्म्या डावातच हा पल्ला गाठला. त्यात सात शतके आणि दहा अर्धशतकांचा समावेश आहे, म्हणजे विराटचे विक्रम इतरांपेक्षा वेगाने होत आहेत. त्यामुळेच त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.
या शतकाबरोबरच त्याची एकदिवसीय सामन्यातील शतकांची संख्या 42 झाली आहे. आता त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांचा विक्रम आहे. त्याच्या मागेही जवळपास कोणी नाही आणि पुढेही सचिन वगळता कोणी नाही, त्यामुळे त्याला आता कोणीही रोखू शकत नाही. एकूण धावांमध्येही त्याची प्रगती वेगाने चालू आहे. त्याने अवघ्या 235 सामन्यात 11,285 धावा केल्या आहेत. एकूण धावांत त्याच्यापुढे आणखी काहीजण आहेत पण सचिन तेंडुलकर 18,426 धावांनिशी प्रथम स्थानावर आहे. ज्याप्रमाणे तो खेळतोय ते पाहता लवकरच तो हे लक्ष्यही साध्य करेल. एकदिवसीय सामन्याप्रमाणेच तो कसोटीतही खोऱ्याने धावा काढत आहे. कसोटी व एकदिवसीय सामन्यात मिळून 100 शतकांचा सचिनच्या नावे असणारा विक्रमही तो लवकरच आपल्या नावे करेल.
1988 साली जन्मलेल्या विराट कोहलीचे वय आज 31 वर्ष आहे. वय आणि त्याची तंदुरुस्ती पाहता तो विक्रमांचे एव्हरेस्ट रचू शकतो. विराट कोहली आज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. जागतिक स्तरावर तो सगळ्यात अग्रेसर ब्रॅंड असून विविध कंपन्यांची त्याला कारारबद्ध करण्यासाठी स्पर्धा असते, पण त्याला मिळालेले हे यश त्याच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. शाळेत शिकत असतानाच त्याला क्रिकेटची गोडी लागली. राजकुमार शर्मा हे त्याचे पहिले प्रशिक्षक होते.
त्यांनीच त्याच्यातील महान खेळाडूला ओळखले आणि त्याची कारकीर्द प्रगल्भ झाली. त्याने वडिलांच्या अंतिम संस्काराला जाण्यापूर्वी कर्नाटक विरुद्धच्या रणजी सामन्यात 90 धावांची खेळी केली होती. त्यानंतरच तो वडिलांच्या अंतिम संस्काराला गेला. त्याच्या खेळाबद्दल असलेल्या प्रेमाचे त्यावेळी खूप कौतुक झाले. त्यानंतर कोहलीने आपल्या खेळातील सातत्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले. विराट हा एकमेव फलंदाज असा आहे की त्याने धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त धावा काढल्या आहेत म्हणूनच त्याला चेस मास्टर असेही म्हणतात. विराट कोहली हा भारताचाच नव्हे तर जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. कर्णधारपदाचा कोणताही दबाव त्याच्यावर नसतो उलट कर्णधार झाल्यापासून त्याचा खेळ आणखी बहारला आहे.