कर्णधार दिमुथ करुणारत्नेने झळकावलेल्या 122 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या आपल्या पहिल्याच सामन्यात 268 धावांचे लक्ष्य चार विकेटस् गमावून पूर्ण केले. करुणारत्नेची ही नववी शतकीय खेळी आहे. यादरम्यान सलामी फलंदाज लाहिरू थिरीमानेने (64) चांगली साथ दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे पाचव्या दिवशी श्रीलंकेने सहा विकेटस् राखून विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 28 धावा केल्या. उपहारावेळी श्रीलंकेला विजयासाठी 22 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे पंचांनी खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. करुणारत्नेला नशिबाची साथदेखील मिळाली. 58 धावांवर खेळत असताना टॉम लॅथमने त्याचा झेल सोडला. याच धावसंख्येवर  वॅटलिंगने त्याचे स्टम्पिंग सोडले. त्याने आपल्या 243 चेंडूंत 122 धावांच्या खेळीत सहा षटकार आणि एक चौकार मारला. टीम साऊदीने त्याला बाद केले.

करुणारत्ने व थिरीमानेदरम्यान झालेल्या भागीदारीने विक्रमाची बरोबरी साधली. हॅमिल्टनमध्ये 1991 साली जॉन राईट आणि ट्रेव्हर फ्रँकलिन यांनी 161 धावांची भागीदारी रचली होती. ही भागीदारी संघासाठी निर्णायक ठरली. कारण, गॉलच्या मैदानावर कोणत्याही संघाला 99 च्या पुढचे लक्ष्य पार करता आलेले नाही व त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सामन्यात श्रीलंकेसाठी हा नवीन विक्रम आहे.

श्रीलंकन संघाने पाचव्या दिवसाची सुरुवात बिनबाद 133 अशी केली. संघाला विजयासाठी 135 धावांची आवश्यकता होती. न्यूझीलंड संघाला पहिले यश थिरिमानेच्या रूपात मिळाले. विल्यम समरविले याने त्याला बाद केले. मैदानातील पंचांनी नाबाद दिल्यानंतर रिव्ह्युला निर्णय बदलण्यात आला. कुसल मेंडिसला एजाज पटेलने बाद केले. करुणारत्नेने यानंतर मॅथ्यूज सोबत तिसर्‍या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. करुणारत्ने व कुसल परेरा लवकर बाद झाले. मात्र, धनंजय डिसिल्वा (14) व मॅथ्यूजने दोन सत्र शिल्लक असतानाच संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा व शेवटचा कसोटी सामना गुरुवारी कोलंबो येथे खेळविण्यात येईल.


Find out more: