वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात पाच विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलणारा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने नवा इतिहास रचला आहे. बुमराहने दुसऱ्या डावात ७ धावात 5 बळी टिपून नवा विक्रम आपल्या नावावर केला. असा विक्रम करणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. कसोटीच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साउथ अफ्रीका आणि वेस्ट इंडीज या देशांच्या दौऱ्यात कसोटी सामन्याच्या एकाच डावात पाच गडी बाद करणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने आत्तापर्यंत ११ कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे या चार देशांच्या पहिल्याच दौऱ्यात त्याने हा विक्रम केला आहे. 

भारताने अँटिग्वा कसोटी ३१८ धावांनी जिंकत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावात रहाणेच्या १०२ आणि हनुमा विहारीच्या ९३ धावांच्या जोरावर ७ बाद ३४३ धावा करत विंडीजसमोर ४१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संपूर्ण संघ १०० धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. बुमराहने फक्त ७ धावा देत ५ बळी मिळवले. 

बुमराहने दुसऱ्या डावात कार्लोस ब्रेथवेट, जॉन कॅपबेल, डॅरेन ब्रावो, शाई होप आणि जेसन होल्डर या फलंदाजांची शिकार केली. त्याने ब्रेथवेटला सोडून इतर चार जणांची थेट दांडी गुल केली. त्यामुळे बुमराहने कसोटीतील एका डावात चार फलंदाजांना बोल्ड करणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज ठरला. ब्रेथवेटला बुमराहने ऋषभ पंतच्या साहाय्याने झेलबाद केले. 

मागील महिन्यात इंग्लड येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशाविरूद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने चार फलंदजांना बोल्ड केले होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात असे करणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज बनला. 


Find out more: