भारत सध्या वेस्ट विंडीजच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून विंडीज विरुद्ध दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी जमेकाच्या मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विक्रम मागे टाकण्याची संधी आहे हा सामना जिंकून कोहलीला नवा किर्तीमान प्रस्थापित करण्याची संधी आहे.

हा कसोटी सामना जर भारताने जिंकला तर भारताला सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनी आणि कोहली संयुक्तपणे अव्वलस्थानी येतील . दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येकी २७-२७ सामने जिंकून दिले आहेत. विराट कोहलीच्या तुलनेत महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून कोहलीने आतापर्यंत ४७ सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे.विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत कोहलीने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय दुसऱ्या विजयासह भारतीय संघ चॅम्पियनशीप गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दरम्यान पहिल्या सामन्यात कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मागे टाकला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. यापूर्वी हा विक्रम गांगुलीच्या नावे होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात २६ कसोटी सामने खेळले असून यातील १२ सामन्यात विजय तर ९ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ सामने अनिर्णित राहिले होते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११ विजय, १० पराभव आणि ७ सामने अनिर्णित असे रेकॉर्ड होते.


Find out more: