कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत 257 धावांनी बाजी मारत मालिकेत 2-0 अशी सरशी साधली.
पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना परत पाठवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते. वेस्ट इंडिजला विजयासाठी दिलेले आव्हान अशक्यप्राय असल्यामुळे भारत चौथ्या दिवशीच सामना जिंकणार हे निश्चीत झाले होते. अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजला खिंडीत पकडले.
विंडीजच्या काही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. ब्रुक्सने अर्धशतक झळकावत विंडीजचा पराभव पाचव्या दिवशी ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही विराट कोहलीच्या अचूक फेकीवर धावबाद झाला. अखेरच्या फळीत ब्लॅकवूड-होल्डर जोडीनेही छोटेखानी भागीदारी रचत विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडून देण्यात मदत केली.
मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर विंडीजचे इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस सामन्यात बाजी मारत भारताने वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट गोड केला. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ 3 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.