भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपले अव्वल स्थान गमावले आहे.वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावामध्ये तो शून्यावर बाद झाल्याने त्याला आपले आयसीसी कसोटी क्रमवारी मधील पहिले स्थान गमावावे लागले. अ‍ॅशेस मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने त्याच्या जागेवर कब्जा केला आहे.

एका वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात नेहमीच तुलना होत असते.कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीमध्ये कोहली हा ९०३  गुणांसह अव्वल स्थानावर होता. पण अ‍ॅशेस कसोटी मालिकेत दमदार कामगिरीच्या जोरावर स्मिथने ९०४  गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

या दोघांशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७८ रेटिंग पॉइंट्सह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा विंडीजविरुद्धच्या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. मात्र ८२५ रेटिंग पॉइंट्सह तो चौथ्या स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं विंडीज विरुद्ध चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तो ७२५ रेटिंग पॉइंट्स मिळवून सातव्या स्थानावर पोहचला आहे.

दरम्यान,वेस्ट इंडीजविरूद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ही मालिका २- ० अशा फरकाने जिंकली. मात्र विराट कोहली या कसोटी मालिकेत केवळ १३६ धावा काढू शकला. त्यामुळेच त्याला आयसीसी कसोटी क्रिकेट मधील पहिले स्थान गमवावे लागले.


Find out more: