
टी-२० क्रिकेटमधून भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने निवृत्तीची घोषणा केली. ती या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. ३२ टी -२० सामन्यात मितालीने भारताचे नेतृत्व केले असून तीन महिला क्रिकेट विश्वचषकाचाही यात समावेश आहे.
२०१२ मध्ये श्रीलंका, २०१४ मध्ये बांग्लादेश आणि २०१६ मध्ये भारतात रंगलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर अशी ओळख निर्माण करणाऱ्या मिताली राजने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या तिन्ही वेळेस भारतीय संघाला विश्वचषकावर नाव कोरण्यात अपयश आले.
मिताली राज भारताची पहिली टी-२० कर्णधार आहे. तिने २००६ मध्ये डर्बीच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले. तिच्या नावे भारताकडून सर्वात प्रथम २००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अगोदर मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला गाठला होता. ८८ टी-२० सामन्यात मिताली राजने १७ अर्धशतकांसह २ हजार ३६४ धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या आहे.