दक्षिण आफ्रिकेने विशाखापट्टणम कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारताला चांगलच झुंजवले असून आफ्रिकेची ५०२ धावांचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली, पण आफ्रिकेने सलामीवीर डीन एल्गरच्या शतकी खेळीच्या जोरावर फॉलोऑनची नामुष्की टाळली. १६० धावांची खेळी करत एल्गरने आफ्रिकेची बाजू भक्कम करण्यात महत्वाचा वाटा उचलला.
कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि क्विंटन डी-कॉकने त्याला चांगली साथ दिली. अखेरीस एल्गरला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जाडेजाने आपले स्थान पक्के केले. जाडेजा डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर्वात जलद २०० बळींचा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
रविंद्र जाडेजाचा डीन एल्गर हा कसोटी क्रिकेटमधील २०० वा बळी ठरला आहे. ही कामगिरी आतापर्यंत फक्त १० भारतीय गोलंदाजांनाच करता आलेली आहे. आपल्या ४४ व्या कसोटीमध्ये रविंद्र जाडेजाने २०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. रविंद्र जाडेजा या यादीमध्ये इतर गोलंदाजांच्या मागे असला तरीही कमी कसोटींमध्ये त्याने हा पल्ला गाठल्यामुळे आगामी काळात तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो.