
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आपण भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे करिअर संपवल्याचा दावा केला आहे. सध्या पाकिस्तानच्या संघातून बाहेर असलेल्या मोहम्मद इरफानने दावा केला आहे की, मर्यादित षटकांच्या खेळात त्याने गौतम गंभीरचे करिअर संपवले. हा दावा त्याने एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
2012 मध्ये द्विपक्षीय मालिकेमध्ये 7 फूट 1 इंच गोलंदाज मोहम्मद इरफानने गौतम गंभीरला 4 वेळा (टी20 आणि एकदिवसीय) बाद केले होते. त्यानंतर गंभीरला पुढील मालिकेतून वगळण्यात आले होते.
मोहम्मद इरफान म्हणाला की, भारतीय गोलंदाज माझ्याविरूध्द खेळू शकले नाहीत, मला कोणीतरी सांगितले की, 2012 च्या मालिकेत माझ्याविरूध्द खेळताना त्यांना अडचण निर्माण होत होती, माझ्या उंचीमुळे त्यांना बॉल देखील दिसत नसे.
इरफान म्हणाला की, गंभीरला माझ्याविरूध्द खेळण्यास आवडत नसे. तो नेहमीच माझ्याकडे बघणे देखील टाळायचा. मला आठवते 2012 च्या मर्यादित षटकांच्या मालिकेत मी त्याला 4 वेळा बाद केले होते.
गंभीरने शेवटचा टी20 सामना पाकिस्तानविरूध्द अहमदाबाद येथे खेळला होता. इरफानने सांगितले की, गंभीरला वाटायचे की माझा बॉल ताशी 130-135 किमी वेगाने येईल. मात्र मी ताशी 145 किमी वेगाने गोलंदाजी करत होतो. यामुळे गंभीरला पुल करण्यास अडचण होत होती. त्यावेळी युवराज सिंहने देखील त्याला पुल न करता कट शॉट खेळण्यास सांगितले. मोहम्मद इरफानने केलेल्या या दाव्यावर भारतीय युजर्सने देखील मिम्स शेअर करत त्याची खिल्ली उडवली.