उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याला उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वा सुरुवात होईल.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. भारताने विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या कसोटीत 203 धावांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे.

या सामन्यासाठी असा असू शकतो 11 जणांचा संभाव्य भारतीय संघ – 

सलामीवीर – मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा 

मयंक आणि रोहितने विशाखापट्टणमला पहिल्यांदाच कसोटीत एकत्र सलामीला फलंदाजी केली होती. या दोघांनीही पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करताना पहिल्या डावात 317 धावांची मोठी भागीदारीही रचली होती.

या सामन्यात मयंकने पहिल्या डावात 215 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर रोहितने या सामन्यातील दोन डावात अनुक्रमे 176 आणि 127 धावांची शतकी खेळी केली होती. त्यांच्या या कामगिरीनंतर ते दुसऱ्या कसोटीसाठीही भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात सलामीवीर म्हणून मयंक आणि रोहित कायम राहतील याची दाट शक्यता आहे.

मधली फळी – चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे

रोहित आणि मयंकने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात चांगली सुरुवात दिल्यानंतरही भारताची मधली फळी कोलमडली होती. पण दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने आक्रमक खेळ करताना 81 धावांची चांगली खेळी केली होती. तसेच विराट आणि अजिंक्य रहाणेनेही दुसऱ्या डावात चांगला खेळ केला होता. त्यामुळे तेही मधल्या फळीत कायम राहण्याची शक्यता आहे.


Find out more: