10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 1 डाव आणि 137 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
तसेच या पराभवामुळे त्यांना 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 अशी पिछाडी देखील स्विकारावी लागली आहे.
या पराभवानंतर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघात अनुभवाची कमी असल्याचे कारण पुढे केले आहे. तसेच मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला, एबी डीविलियर्स, मॉर्ने मॉर्केल आणि डेल स्टेन अशा अनेक अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची जागा एका रात्रीत भरुन निघू शकत नाही, असेही डूप्लेसिसने म्हटले आहे.
डूप्लेसिस म्हणाला, ‘मला वाटते संघात अनुभवाची कमी आहे. या कसोटी मालिकेआधीही मी म्हणालो होतो, सर्वोत्तम कसोची संघ तोच असतो ज्यांच्याकडे सर्वाधिक अनुभव असतो. जेव्हा तूम्ही या भारतीय संघाकडे पाहता, तेव्हा लक्षात येईल त्यांच्या खेळाडूंकडे अनुभव आहे. त्यांचे खेळाडू अनेक कसोटी सामने खेळले आहेत.’
‘आम्ही आत्ता या परिस्थितीत आहोत की आम्ही आमचे जवळ जवळ सर्व अनुभवी खेळाडू गमावले आहेत. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, हाशिम आमला आणि एबी डीविलियर्स यांच्या सारख्या खेळाडूंची जागा एका रात्रीत भरुन निघू शकत नाही.’
‘आत्ता आमचा संघ नवीन आहे. ज्यामध्ये 5, 6, 10, 11, 12, 15 कसोटी सामने खेळलेले खेळाडू आहेत. त्यामुळे वेळ लागेल. जर तूम्ही कोणत्याही संघातून सर्वोत्तम खेळाडू काढून घेतले तर त्यांनाही अशाच आव्हानांना सामोरे जावे लागेल.’
तसेच डूप्लेसिसने म्हटले आहे की त्याला कर्णधार म्हणून आणि क्विंटन डी कॉक आणि डीन एल्गारने अनुभवी खेळाडू म्हणून संघातील खेळाडूंना प्रेरित केले पाहिजे.
डूप्लेसिस म्हणाला, ‘वरिष्ठ खेळाडू म्हणून आम्ही चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. मी, डीकॉक आणि एल्गारने धावा केल्या पाहिजे. आम्ही अन्य खेळाडूंकडून अधिक धावा करण्याची अपेक्षा करु नये. आम्ही पहिल्यांदा धावा केल्या पाहिजे आणि मग अन्य खेळाडू आम्हाला साथ देतील.’