आचार्य अत्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व होते. आचार्य अत्रे यांची आज जयंती. एक प्रभावी विनोदी वक्‍ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे यांचे संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोठीत या गावी 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सासवड, पुणे व मुंबई येथे झाले.

महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पत्रकार, वृत्तपत्र संपादक, नाटककार, विनोदी लेखक, राजकारणी, वक्‍ते, कवी, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, हजरजबाबी हे त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे पैलू होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला “कऱ्हेचे पाणी’ हे नाव दिले. ते त्याकाळी बी.ए., बीटी झाले होते तर लंडन येथे जाऊन तेथील टीडी (टीचर्स डिप्लोमा) घेणारे पहिले महाराष्ट्रीय होते.

मुंबईतील रॉबर्ट मनी स्कूल, फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये त्यांनी अध्यापन केले. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला. ही शाळा म्हणजे अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. 1937 साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.1934 साली सरस्वती सिनेटोनच्या नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले आणि त्यांचा चित्रपट क्षेत्राशी संबंध आला. त्यानंतर वर्ष 1937 मधे “हंस पिक्‍चर्स’साठीस्वतःच्याच कथांवरून “प्रेमवीर’ या मराठी व “बेगुनाह’ या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. 1938 साली “हंस’साठीच “ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा लिहिली. त्यांनी लिहिलेला “ब्रॅंडीची बाटली’ हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.

राजगुरू व अभ्यंकर या दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने “नवयुग चित्रपट कंपनी’ काढली.काही मतभेदामुळे त्यांनी नवयुग सोडले व “नवयुग पिक्‍चर्स’ ही कंपनी काढली व “लपंडाव’ चित्रपट काढला. त्यांनी दिग्दर्शित केलेला “श्‍यामची आई’ चित्रपट रसिकांनी डोक्‍यावर घेतला. 1954 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते.

साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल?, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, डॉक्‍टर लागू ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके होत. त्यांनी “केशवकुमार’ या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या. “झेंडूची फुले’ हा त्यांचा विडंबनात्मक कवितांचा संग्रह अतिशय गाजला. संयुक्‍त महाराष्ट्र समितीचे ते एक प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अनेक जनआंदोलनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 1942 साली नाशिक येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या स्मृतीस अभिवादन

माधव विद्वांस

Find out more: