महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल आज, शनिवार 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळ्या अफवा दररोज सोशल मीडियावर वायरल होत होत्या. अखेर एसएससी बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता प्रसिद्ध होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संपादित केलेल्या गुणांच्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे.
येथे पाहता येणार निकाल
असा पाहाल निकाल
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा आसन क्रमांक (Seat No) L034567 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव वंदना आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा आसन क्रमांक (Seat No) L034567 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये VAN असं लिहावं लागेल.
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात.