दहावीचे पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून आर. के नगरातील प्रणव सुनील जरग या विद्यार्थ्याने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, प्रत्यक्षात आज (ता.८) शनिवारी जाहीर झालेल्या एसएससी बोर्डाच्या निकालांमध्ये प्रणव 42 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला.
घरी आर्थिक सुबत्ता आहे. पारंपरिक बांधकाम व्यवसायामुळे जरग कुटूंबाचा नावलौकिक आहे. सर्व सोयी पायाशी लोळण घेत असतानाही प्रणवने केवळ भीतीपोटी मृत्यूला कवटाळले. प्रत्यक्ष निकालात पास झालेला प्रणव आयुष्याकडून मात्र हरला याची हळहळ प्रणवचे नातेवाईक आणि मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे.
जरग कुटुंबीय मूळचे करवीर तालुक्यातील महे येथील आहेत. 1985 पासून त्यांचे कुटुंब आर के नगर येथे राहण्यास आले. आजोबा कोल्हापुरातील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक होते. त्यानंतर प्रणवचे वडील व चुलतेही बांधकाम व्यवसायात होते. वडिलांनी वाढवलेला व्यवसाय मुलांनी सांभाळावा इतकीच काय ती कुटुंबियांची अपेक्षा होती. प्रणवने परीक्षेचा अभ्यासही करत होता, पण गेले काही दिवस निकालाची भीती त्याला सतावत होती.
आत्महत्येपूर्वी चार दिवस तो नेहमी मी इंग्रजी विषयात नापास होणार असे घरच्यांना सांगत होता. यानंतरही घरचे त्याला धीर देत होते. नापास झालास तरी चालेल काही हरकत नाही पुन्हा प्रयत्न कर, असा धीर देत होते. पण प्रणव मनातून खचला. गुरुवारी सायंकाळी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शनिवारी बोर्डाचा निकाल जाहीर होताच मित्रपरिवाराने तो पास झाल्याचे नातेवाईकांना कळवले, पण त्यांचा आनंद केव्हाच हरवला होता. त्याच्या घरी सध्या धीरगंभीर वातावरण आहे. केवळ आणि केवळ प्रणव आत्ता असायला हवा होता इतकीच काय ती भाबडी आशा देवाकडे कुटुंबीय व्यक्त करत आहेत. तो देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयाचा विद्यार्थी होता.