खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे वरवंड (ता. दौंड) येथील आयटीआयचे 34 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्याने त्यांचे वर्ष वाचले आहे. वरवंड या विद्यार्थ्यांची बुधवार (दि. 31 जुलै) दुपारी 2ः30 वाजता सीओपीए या अभ्याक्रमाची अंतिम परीक्षा होती.

या सर्वांनी त्यांचे परीक्षा शुल्क ऑनलाइन भरले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे शुल्क भरले नाही, असे शिक्षण विभागाच्या पोर्टलवर दिसत होते. परिणामी त्यांना हॉलतिकीट मिळू शकले नाही.

साहजिकच या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यास नकार देण्यात आला. मंगळवारी (दि. 30) दुपारी हा प्रकार लक्षात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची ही अंतिम परीक्षा असल्याने अत्यंत महत्त्वाची होती. केवळ तांत्रिक कारणाने ती देता आली नसती, तर या मुलांचे वर्ष वाया जाणार होते, त्यामुळे भांबावलेल्या या मुलांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही घटना त्यांना कळवली.

ही बाब लक्षात येताच सुळे यांनी तातडीने ट्‌वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री आणि संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी आवश्‍यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. या मुलांच्या परीक्षेला काही तासच उरले असल्यामुळे यावर तातडीने कार्यवाही व्हावी, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.

या प्रयत्नांना अपेक्षित यश आले आणि बुधवारी मुलांनी परीक्षा दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेचे प्राचार्य आणि अन्य शिक्षकांनी सुळे यांचे आभार मानले.

Find out more: