राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठी 6 हजार उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे. या सर्व उमेदवारांना एक रुपयाही न देता शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे. यामुळे उमेदवारांकडून आनंदोत्सवच साजरा करण्यात येऊ लागला आहे.
शुक्रवारी (दि.9) शिक्षण विभागाकडून पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व काही खासगी संस्थाच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. उमेदवारांनी नोंदविलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, उपलब्ध जागा यानुसार गुणवत्ता यादी तयार करून संबंधित शाळांमध्ये उमेवारांची शिफारस करण्यात आली आहे.
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणानुसार मेरिट लावण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित शाळांमध्ये जावून रुजू होण्यासाठी 13 ते 21 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत उमेदवारांनी कागदपत्रासह शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. काही अडचणी आल्यास उमेदवारांना प्राथमिक व शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. काही खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसह प्राधान्यक्रम नोंदविलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीची निवड सूची 16 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
न्यायालयाच्या परवानगीनेच शिक्षकांना नियुक्ती पत्र देणार
उच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत. प्रत्येक संस्थाचे मुलाखतीशिवाय राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीतील 3 हजार 200 पदे रिक्त राहिली आहेत. माजी सैनिक, उर्दू माध्यम व काही आरक्षणातील उमेदवार भरतीसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे या जागा रिक्त पडल्या आहेत. शासनाच्या मान्यतेसाठी इतर वर्गांमध्ये या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत. यामुळे आखणी उमेदवारांना नोकरीसाठी संधी मिळणार आहे. दिवस-रात्र काम चालू ठेवून गुणवत्तेनुसारच भरती प्रक्रिया राबविली.