“इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया’ (आयसी-एआय) यांनी घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए अंतिम परीक्षेचा आणि “सीए फाउंडेशन कोर्स’चा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. हा निकाल “आयसीएआय’च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

ही परीक्षा मे-जून 2019 मध्ये घेण्यात आली होती. सीएच्या नवीन अभ्यासक्रमाचा ग्रुप एकमध्ये 1,500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्‍केवारी 16.87 इतकी आहे. तर ग्रुप दोनचा निकाल 17.55 टक्‍के इतका लागला असून,

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 146 आहे. सीए नवीन अभ्यासक्रमात देशातून भोपाळचा नयन गोयल प्रथम, बंगळुरू ची काव्या एस. द्वितीय, तर जयपूरचा अर्पित चित्तोरा हा तृतीय क्रमांक मिळविला आहे.

सीए जुन्या अभ्यासक्रमात ग्रुप एकचा 18.40 टक्‍के इतका निकाल लागला असून, यात 4 हजार 610 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रुप दोनचा निकाल 23.72 टक्‍के लागला असून, यात 8 हजार 762 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जुन्या अभ्यासक्रमात देशातून जयपूरचा अजय अगरवाल प्रथम, हैद्राबादची राधालक्ष्मी व्ही. पी. द्वितीय, तर ठाण्यातील उमंग गुप्ता याने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

फाउंडेशनमध्ये पुण्याचा रजत राठी देशात प्रथम सीए फाउंडेशनमध्ये परीक्षेसाठी एकूण 30 हजार 971 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 5 हजार 753 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. एकूण निकाल 18.58 टक्‍के लागला आहे. मुलांची उत्तीर्णाची टक्‍केवारी 18.47, तर मुलींची टक्‍केवारी 18.72 इतकी आहे. देशात फाउंडेशन परीक्षेत पुण्याचा रजत सचिन राठी हा 87.50 टक्‍के गुण मिळवून देशात प्रथम आला आहे. सहकारनगर येथील रजत राठी याचे शालेय शिक्षण शिवाजीनगर येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम येथे झाले असून, दहावीला 95.4 टक्‍के गुण मिळविला आहे. अकरावी-बारावी फर्गसनमध्ये शिक्षण झाले. बारावीला 88 टक्‍के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे, अकरावी-बारावीपर्यंत शिक्षण विज्ञान शाखेतून घेऊनही वाणिज्य शाखेकडे आकर्षित झाला असून, त्यातून करिअर करण्याचा मनोदय रजत याने व्यक्‍त केला आहे.


Find out more: