“पवित्र पोर्टल’मार्फत राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील 3 हजार 100 शिक्षकांच्या रिक्तपदांची मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शिफारस यादी 16 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाची लगबग सुरू झालेली आहे.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थामध्ये पहिल्या टप्प्यात 12 हजार 140 शिक्षकांची भरती करण्यात नियोजन केले आहे. यातील 9 हजार 128 पदे मुलाखतीशिवाय भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यातील 5 हजार 822 उमेदवारांची थेट निवड झाली आहे. माजी सैनिक, उर्दू माध्यम यासह इतर आरक्षणातील उमेदवार न मिळाल्यामुळे 3 हजार 258 जागा शिल्लकच राहिल्या आहेत. या जागा कन्व्हर्ट करण्यासाठी शासनाला आदेश काढावे लागणार आहेत.
खासगी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणार पुणे जिल्ह्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. मुलाखतीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्थांच्या लॉगिनवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांच्या अंतिम निवडीबाबतच्या कार्यपद्धतीविषयी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांच्यासाठी आज (बुधवार) दारुवाला पूलाजवळील आर.सी.एम. गुजराती हायस्कूलमध्ये सकाळी 10.30 वाजता मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे. यावेळी रिक्त पदांची संख्या, मुलाखतीचे व कागदपत्र तपासणीचे ठिकाण, समन्वय अधिकाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांक यांची माहिती संस्थांना सादर करावी लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी खासगी शैक्षणिक संस्थांना बजाविले आहेत.