
पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी परीक्षा 8 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षापासून ही परीक्षा भारतीय भाषांमध्ये होणार असल्याचे बोर्डाने नमूद केले.
देशभरातील 110 शहरांतील केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सीबीएसईच्या बोर्डावरून ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. परीक्षासंदर्भात सर्व माहिती संकेतस्थळावर दि. 19 ऑगस्टपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे शुल्क 18 ते 23 सप्टेंबर या कालावधीत भरता येणार आहे.
यावर्षी सर्व भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीबीएसईने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.