पुणे – ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या धर्तीवर महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल सुरू करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.
अहमदाबाद महापालिकेने असेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. तोच पॅटर्न पुण्यात राबवण्यात येत आहे. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजपने जाहीर केला होता. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी गुजरातच्या कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. तर, महाविद्यालय, रुग्णालय उभे करून ते खासगी संस्थेस 30 वर्षांसाठी चालवण्यास देण्याचा पर्याय नाकारण्यात आला. तसे झाले, तर तेथे मोफत किंवा अल्पदरात उपचार होऊ शकणार नाहीत, असे मत नोंदवण्यात आले.
त्यामुळे पालिका सदस्यांचा समावेश असलेला ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय चालवावे, हा पर्याय निवडण्यात आला. ट्रस्टवर अधिकारी, पदाधिकारी हेच विश्वस्त असतील. यासाठी 600 कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि भरती आता ट्रस्टमार्फत केली जाणार आहे. तर, या महाविद्यालयासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीही तरतूद केली होती.