पुणे – महाविद्यालयात ऍडमिशन न मिळाल्याने नैराश्‍य आलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे चिडलेल्या पालकांनी मुलाचा मृतदेह घेऊन थेट प्राचार्यांचे दालन गाठले. त्यांच्या केबिनबाहेर मृतदेह ठेऊन महाविद्यालय जबाबदार असल्याचा आरोप करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यानंतर दत्तवाडी पोलिसांनी मध्यस्थी करुन मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती पालकांना केली. ही घटना बुधवारी दुपारी दत्तवाडी पोलीस ठाण्यामागील शाहू महाविद्यालयात घडली.

आकाश सदाफुले (18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला शाहू महाविद्यालयात 11 वी सायन्सला ऍडमिशन घ्यायचे होते. आकाशने मंगळवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याने मित्राला “आय एम गोईंग टू सुसाईड’ असा मेसेज पाठवला. त्याच्या मृत्यूने घरच्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी सकाळी त्याचा मृतदेह घेऊन थेट महाविद्यालय गाठले.

हे पाहून तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. पालकांनी प्राचार्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत “दोषींना अटक करा,’ अशी मागणी केली. महाविद्यालय प्रशासनाने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. यामुळे दत्तवाडी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी पालकांची समजूत घातली. असा थेट गुन्हा दाखल करुन कोणालाही अटक करता येत नसल्याचे समजावून सांगितले. यानंतर पालकांकडून तक्रार अर्ज लिहून घेण्यात आला. यानंतर पालकांनी मृतदेह नेला.


Find out more: