पुणे -शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेल्या तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (दि. 13) दिवसभरात आणखी दोन रूग्ण आढळून आले. तर 137 व्यक्ती संशयितांना टॅमीफ्लूचे औषध देण्यात आला.
शहरासह जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मागील 3 आठवड्यांत सूर्यदर्शन झालेले नाही. ढगाळ वातावरण, पाऊस आणि गारवा यामुळे हवामानात बदल झाला असून, हे हवामान संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांना निमंत्रण देणारे आहे.
सध्याच्या ढगाळ आणि दमट वातावरणामध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, कणकणी येणे, सांधेदुखी असा त्रास जाणवतो. मात्र, नागरिक “व्हायरल इन्फेक्शन’ आहे, असे म्हणून घरगुती उपाय करताना दिसतात. मात्र, त्यामध्ये कोणता त्रास होतोय हे लक्षात न आल्यामुळे आजार वाढतो.
संसर्ग टाळानागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधूनच घराबाहेर पडावे. घसा खवखवण करणे, दुखणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी. घर आणि परिसरात पावसाच्या साठलेल्या पाण्याला मोकळी जागा करून द्यावी.