पुणे – मागील 15 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली. 2 दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे रस्ते कोरडे पडले. मात्र, पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेली मातीही कोरडी झाल्यामुळे, आता मातीचा धुराळा उडत आहे. ज्या ठिकाणी खड्डे आणि खडी पडलेली आहे, त्याठिकाणी अधिक धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तोंडाला रूमाल बांधून प्रवास करावा, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसाने सर्व रेकॉर्ड मोडत धरणे 100 टक्‍के भरली. धरणातून विसर्ग सोडल्यामुळे नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला. तर पावसाने रस्त्यांवर पाणी-पाणी झाले होते. नळस्टॉप चौक, पौड रस्ता, कात्रज, येरवडा, कोंढवा यासह अन्य भागांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे सर्व खड्डे पाण्याने भरलेले होते. आता पावसाने विश्रांती घेतली आणि हळूहळू पाणी ओसरले, खड्डे आणि रस्ते कोरडे पडले. पाण्याबरोबर वाहून आलेली मातीही कोरडी पडली. मात्र, या मातीवरून वाहने गेल्यामुळे धुराळा उडत आहे.


Find out more: