आजकालच्या धावत्या युगाला अनुसरुन बदललेली आपली जीवनशैली, असंतुलित आहार, जेवण्याचे अनियमित असणारे वेळापत्रक, व्यायामाचा अभाव आणि काम करताना किंवा एरवीही खुर्चीवर बसतानाचे चुकीचे पोझिशन किंवा स्थिती या सगळ्यांमुळे आपल्यापैकी बहुतेकांनी पाठदुखीची तक्रार कधी ना कधी अनुभवलेली असते. एकदा पाठदुखी सुरु झाली की मग रोजची लहान-सहान कामे करणे देखील अशक्यप्राय होऊन बसते.
काही प्राथमिक औषधोपचारांनी तात्पुरता आराम मिळत असला तरी या औषधांचा परिणाम ओसरला की पाठदुखी पुनश्च सुरु होते. तसेच फार काळ जर पेन किलर्सचा वापर केला गेला, तर त्याचेही दुष्परिणाम जाणवू लागतात. परिणामी, पाठदुखीच्या जोडीने अॅसिडीटी, शरीरामध्ये उष्णता वाढून सतत तोंड येणे, असल्या नव्या तक्रारी सुरु होतात. त्यामुळे पाठदुखीच्या त्रासातून मुक्तता मिळविण्याकरिता शक्यतो नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांचा वापर करणे कधीही चांगले.
हर्बल किंवा आयुर्वेदिक तेलांनी केलेला मसाज पाठदुखीसाठी चांगला आहे. घरच्याघरी मसाज करण्यासाठी निलगिरी, मोहोरी, किंवा नारळाच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. तेल थोडे गरम करून घेऊन मग त्याने मसाज करावा. त्यानंतर थोड्या वेळाकरिता तेल तसेच राहू देऊन, मग गरम पाण्याने स्नान करावे. आजकाल बाजारामध्ये खास मसाजसाठी अनेक प्रकारची आयुर्वेदिक व हर्बल तेले उपलब्ध असतात. पण वैद्यकीय सल्ल्यानुसारच या तेलांचा वापर करावा. पाठदुखीसाठी तेलाचा मसाज, आवश्यकता असेल तर दररोज करावा.
हळदीमध्ये असलेल्या ‘ कुर्कुमीन ‘ ह्या तत्वामुळे अंगावरील सूज कमी होऊन अंगदुखीपासून आराम मिळतो. त्यामुळे पाठदुखी सतावत असल्यास दररोज एक ग्लास दुधामध्ये पाव चमचा हळद घालून प्यावे. आवश्यकता वाटल्यास दुधामध्ये अर्धा चमचा मध चवीकरिता घालावा. त्याचप्रमाणे मॅग्नेशीयम सल्फेटमुळे (यालाच एप्सम सॉल्ट असेही म्हणतात) ही अंगावरील सूज कमी होण्यास मदत मिळते. याच्या वापराने रक्ताभिसरण सुधारून, अंगदुखी कमी होते.
आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये हे एप्सम सॉल्ट घालून ते पाणी पाठीवर घेत पाठ शेकून काढावी. आल्याचा वापर केल्यानेही अंगावरील सूज व दुखणे कमी होण्यास मदत होते. दीड कप पाण्यामध्ये आल्याचे काही तुकडे घालून हे पाणी उकळून घ्यावे. दिवसभरात हे पाणी थोडे-थोडे करून तीन ते चार वेळा प्यावे.
बर्फाची पिशवी पाठीवर फिरविल्यानेही पाठीवर सूज असल्यास ती कमी होऊन पाठदुखी कमी होते. जर बर्फाची पिशवी नसेल, तर एखाद्या जाडसर टॉवेलमध्ये बर्फ घेऊन तो बर्फ पाठ दुखत असलेल्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटे फिरवावा. पाठदुखीमध्ये गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेतल्यानेही आराम मिळतो.
रात्रीची झोप झाल्यानंतर आपण सकाळी उठतो तेव्हा काही वेळा मान अवघडल्यासारखी होते किंवा पाठदुखी सुरु होते. याचाच अर्थ असा की आपली झोपण्याची पद्धत किंवा पोझिशन चुकीची असू शकते. मानेखाली खूप जाड उशी घेतल्याने ही मान अवघडल्यासारखी होते. त्यामुळे मानेखाली खूप जाड उशी घेण्याचे टाळावे. तसेच पाठ दुखत असल्यास गुडघ्यांच्या खाली उशी ठेवावी. त्यामुळे पाठीवरील ताण कमी होतो.