सांगली : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. कारण सांगलीत आज तब्बल 12 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
सांगलीतील इस्लामपुरात आज 12 नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल 147 वर पोहोचला आहे.
महत्त्वाचं म्हणजे इस्लामपुरात जे 12 नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या 4 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचं कुटुंब मोठं आहे.
या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, 25 मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी 12 जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.
हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिली होती.
सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आधी पाच आणि आता बारा जणांची भर पडली आहे.
इस्लामपुरातील या कुटुंबातील आधी चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती 23 मार्चला समोर आली होती. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते.
संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.