मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 700 पेक्षा जास्त जणांची देशात टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात मृत झालेल्यांची संख्या 19 झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. तर जगात आतापर्यंत एकूण 22 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत भारतात 834 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले असून एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. गेल्या दोन महिन्यात परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांची देखरेख करण्याची गरज असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दोन महिन्यांत परदेशातून भारतात जवळपास 15 लाख प्रवासी आले आहेत.
कोरोनाचा आकडा महाराष्ट्रातही वाढला आहे. विदर्भात पाच जणांना लागण झाल्याचे समोर आलं आहे. यातील चारजण नागपूरचे तर एक गोंदीया जिल्ह्यातील आहे. यासह नागपूर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
जगात इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार उडाला आहे. इटलीमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात तब्बल 919 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इटलीत कोरोनामुळे मृतांची संख्या 9134 झाली आहे.