
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्यातच आता सरकारने ‘आरोग्य सेतू’ नावाचा अॅप लाँच केला आहे. सरकार या अॅपद्वारे संक्रमित लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे. याशिवाय युजर्स इतर रुग्णांच्या संपर्कात आहेत का याची देखील माहिती सरकारला मिळेल. याआधी सरकारने कोरोना कवच नावाचे अॅप लाँच केले होते.
आरोग्य सेतू अॅप युजरच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करते. सोबतच ब्लूटूथद्वारे लक्ष ठेवते की युजर संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आहे की नाही. दोघांमध्ये किती अंतर आहे हे देखील याद्वारे समजेल. यात युजरला संक्रमणापासून वाचण्यासाठी टिप्स देखील मिळतील.
या अॅपमध्ये एक चॅटबॉट देखील आहे. जे युजर्सला कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. सोबतच युजर्सला आजाराची लक्षण आहे की नाही, हे देखील सांगेल. या अॅपमध्ये अनेक राज्यांचे हेल्पलाईन नंबर देखील आहेत.