
पुणे : देशभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुण्यातील आणखी तीन जणांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील मृतांचा आकडा 36 वर पोहचला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात संबंधित रुग्णावर उपचार सुरु होते.
पुण्यात आज 4 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यात एका प्रसूतिगृहामध्ये उपचारादरम्यान एका गरोदर महिलेलाही कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपचारांसाठी प्रसूतिगृहामध्ये दाखल झालेल्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांसह 5 ते 6 नर्स यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच संपूर्ण रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे.
एकूणच पुण्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यानंतर आज (14 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील लॉकडाऊनला 3 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.