पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे 10 रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आलेल्या कासा उपजिल्हा रुग्णालयातील दोन शिकाऊ डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने या डॉक्टरांच्या संपर्कात आजवर किती रुग्ण आले आहे याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे.
यापार्श्वभूमीवर तातडीने कासा गाव सील करण्यात आले असून येथील मेडिकल, खासगी दवाखाने, दूध डेअरीसारख्या अत्यावश्यक सेवादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी पालघरमधील कटाळे गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
या मुलीचे कुटुंब डहाणूतील गंजाड गावातील आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर या मुलीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीनंतर पालघरमधील कटाळे गावात वीटभट्टीवरील पाचजण तर कासा उपजिल्हा रुग्णालयातील दोन शिकाऊ डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या गोष्टीची दखल घेत प्रशासनाने अधिकच सतर्कता बाळगणे सुरू केले असून उपजिल्हा रुग्णालय असलेल्या कासा गावातील सर्व अत्यावश्यक सेवा बंद केल्या आहेत. तसेच संपूर्ण गाव सुद्धा सील करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात अजून किती रुग्ण आणि कर्मचारी आले होते. याचा शोध प्रशासन घेत असून सुमारे 150 हून अधिक जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.