मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 778 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे. एवढी मोठी संख्या एकाच दिवसात आढळणे ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोरोनाबाबत चिंता आता आणखीच वाढली आहे.
आज आढळून आलेल्या या रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 6 हजार 427 वर गेला आहे. तसेच आज राज्यभरात कोरोनाने 14 जणांचा बळी घेतला असून कोरोनाने बळी पडलेल्या रुग्णांची संख्या 283 इतकी झाली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहे.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 205 वर गेली आहे. राज्याबरोबर देशाचा आकडा सुद्धा झपाट्याने वाढला आहे. गेल्या 24 तासात 1229 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 700 झाली आहे. यामधून आत्तापर्यंत 4 हजार 325 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाची लागण झाल्याने देशात आत्तापर्यंत 686 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.