लातूर : राज्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनेक जिल्हे कोरोनामुक्त होत आहेत.
अवघ्या चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या लातुरात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला आहे. गुजरातहून लातूरच्या उदगीरमध्ये आलेल्या एक महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही या महिलेने गुजरात ते लातूर असा प्रवास केला.
विशेष म्हणजे गुजरातहून लातूरात येताना तिने अनेक वाहनांची मदत घेतली. तसेच उदगीर आल्यानंतर या महिलेने कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. तसेच प्रवास केल्याची माहितीही लपवली.
मात्र प्रशासनाने या महिलेला शोधून काढत तिची तपासणी केली. त्यावेळी या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. या महिलेवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान चार दिवसांपूर्वी ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये आलेला लातूर जिल्ह्यात अजून एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता हा रुग्ण पुन्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे.