रुग्णालायने रुग्णवाहिका नाकारल्याने पित्याला सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह हातात उचलून घेऊन जावं लागल्याची धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे. रुग्णालयाने मदत नाकारल्याने असहाय्य झालेल्या संपथ कुमार यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ज्या रुग्णालयाकडून त्यांना मदतीची अपेक्षा होती, त्यांनी ऐनवेळी हात वर केल्याने ही दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.

करिमनगर येथील जिल्हा रुग्णालयात सात वर्षांच्या कोलमताचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तरी आपल्या मुलीला यातना सहन कराव्या लागू नयेत यासाठी संपथ कुमार यांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका देण्यासाठी विनवणी केली. मात्र रुग्णालयाने कोणतीच माणुसकी दाखवली नाही.

संपथ कुमार यांना मुलीचा मृतदेह घरी न्यायचा होता. पण खासगी गाडीचं भाडं त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी रुग्णवाहिका मिळावी यासाठी रुग्णालयाकडे विनंती केली होती. कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून अखेर त्यांनी मुलीचा मृतदेह आपल्या हातात उचलून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मुलीचा मृतदेह हातात घेऊन त्यांनी ५० किमीचा प्रवास पायी सुरु केला.

संपथ कुमार यांना अशा अवस्थेत पाहून अखेर एका रिक्षाचालकाला दया आली आणि त्याने त्यांना गावी पोहोचण्यास मदत केली. रुग्णालयाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले असून उलट संपथ कुमार यांनाच घाई होती आणि ते रुग्णवाहिकेची वाट न पाहता निघून गेले असा दावा केला आहे.


Find out more: