कौन बनेगा करोडपती च्या अकराव्या पर्वात प्रेक्षकांना स्पर्धकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील नुपूरची प्रेरणादायी कथा ऐकून अमिताभ बच्चनही अचंबित झाले. जन्मतः दिव्यांग असलेल्या नुपूर सिंहने या कार्यक्रमात साडे बारा लाखांचं बक्षीस पटकावलं.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामधल्या बिघापूरची रहिवासी असलेली नुपूर सिंह. तिच्या धडपडीची कहाणी सुरु झाली तिच्या जन्मासोबतच. डॉक्टरांनी नुपूर जन्मतःच मृत असल्याची घोषणा केली. आई-वडिलांनी टाहो फोडला, तितक्यात एका नातेवाईकाला चिमुकल्या बाळाची हालचाल जाणवली. डॉक्टरांना बोलावलं आणि नुपूर ‘जिवंत’ झाली.

नुपूरच्या जन्मानंतर डॉक्टरांनी दाखवलेली हलगर्जी तिला चांगलीच महागात पडली. तिच्या पदरी आयुष्यभराचं दिव्यांगत्व आलं. मात्र त्यापुढे हार मानेल, तर ती नुपूर कसली. नियतीपुढे झुकणं तिला मान्य नव्हतं. तिचा लढा सुरु झाला, तिची धडपड सुरु झाली.

नुपूरचे वडील रामकुमार सिंह शेतकरी, तर आई कल्पना गृहिणी. साहजिकच नुपूरचं आयुष्य ऐशोआरामचं नव्हतं.

नुपूर लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू होती. बारावीत ती गुणवत्ता यादीत झळकली होती. बीएडची प्रवेश परीक्षा पहिल्या झटक्यात पार करण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं. आता तर ती दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते.

केबीसी बघण्याची आवड तिला होतीच. सहभागी स्पर्धकाच्या आधीच ती प्रश्नांची अचूक उत्तरं देते, असं तिची आई अभिमानाने सांगते.

29 वर्षांच्या संघर्षानंतर नुपूर पोहचली अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर. बारा प्रश्नांची अचूक उत्तरं देत नुपूरने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. संघर्ष पाचवीलाच पूजलेला असताना त्यावर मात करण्याच्या जिद्दीनेच या सावित्रीच्या लेकीने हे यश कमावलं.


Find out more: