भारतीय संस्कृती प्राचीनतम संस्कृतींपैकी एक असून, या संस्कृतीची साक्ष देणारी अनेक प्राचीन मंदिरे देशभरामध्ये अस्तित्वात आहेत. या मंदिरांशी निगडित अनेक पौराणिक, ऐतिहासिक मान्यता, आख्यायिका ही रूढ आहेत. अनेक धार्मिक आस्था, लोककथाही या मंदिरांशी निगडित आहेत. अशी अनेक धार्मिक स्थळे पर्यटनस्थळे म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
असेच एक प्राचीन मंदिर ज्या परिसरामध्ये आहे, तो परिसर राजस्थान राज्यातील भरतपूरपासून थोड्या अंतरावर असून, याला कामवन किंवा कामा नावाने ओळखले जाते. या कामवनाशी निगडित पौराणिक मान्यता अशी, की या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालपणीचा काही काळ व्यतीत केला असल्याचे म्हटले जाते. याच कारणास्तव भाद्रपद महिन्यामध्ये या मंदिरामध्ये कृष्णभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.
कामवनाला ‘कदंबवन’ ही म्हटले जाते. तसेच ‘आदि वृंदावन’ म्हणूनही या परिसराचा उल्ल्केख केला जातो. या ठिकाणी अनेक कदंब वृक्ष असल्याने याचा उल्लेख कदंबवन म्हणून केला जातो. पावसाळयामधे या कदंबवनातील ‘चील महाला’मध्ये मोठी जत्रा भरते. या जत्रेला परिक्रमा जत्राही म्हटले जाते.
या परिसरामध्ये एक प्राचीन मंदिर असून या मंदिरामध्ये ८४ खांब आहेत. या मंदिराची खासियत अशी, की या मंदिरामध्ये कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. येथे कुठले पूजा-पाठ, धार्मिक अनुष्ठानेही होत नाहीत. या मंदिराबद्दल आणखी एक विशेष गोष्ट अशी, की या मंदिरामध्ये ८४ खांब असल्याची मान्यता रूढ आहे.
प्रत्यक्षात मात्र आजवर कोणालाच हे खांब मोजता आले नसल्याने वास्तविक ८४ खांब आहेत किंवा नाही याची खातरजमा आजवर कोणीच करू शकलेले नाही. किंबहुना जेव्हा जेव्हा कोणी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची संख्या ८४ पेक्षा कधी अधिक भरली, तर कधी कमी भरली असल्याचे म्हटले जाते.