पुणे : लालपरी अशी ओळख असणारी एसटी आता आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. एसटीची वेळ आणि ठिकाण समजावे यासाठी एसटीमध्ये “व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ अर्थात “व्हीटीएस’ बसविण्याच्या बहुप्रलंबित प्रस्तावाचा मार्ग मोकळा झाला असून परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते सेवेचा नुकताच प्रारंभ झाला.

प्रवाशांना एसटीचे “लाइव्ह लोकेशन’ समजावे यासाठी वाहन शोध आणि प्रवासी माहिती प्रणाली (व्हेईकल ट्रॅकिंग ऍन्ड पॅसेंजर इनफॉर्मेशन सिस्टीम) प्रायोगिक तत्वावर काही गाड्यांमध्ये बसविण्यात आली. या सिस्टीममुळे बसस्थानकावरील डिस्प्ले बोर्डवर एसटी नक्की किती वाजता आणि किती वेळात येईल, याची माहिती प्रवाशांना समजणार आहे. पुणे ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या पुणे-मुंबई, पुणे-ठाणे, पुणे-बोरिवली या एसटीच्या गाड्यांना ही यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक या विभागामध्ये ही सुविधा राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एसटीची “रिअल’ वेळ समजावी यासाठी लवकर मोबाइल ऍपही प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर एसटीची अचूक वेळ समजणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. यासह एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या चुकीच्या आणि उद्धट उत्तरांना देखील आळा बसणार आहे.


Find out more: