एकदा एका मित्राला सहज विचारले तू सिगरेट का पितोस? त्यावर मिळालेले उत्तर आज मला आठवले.. तो म्हणालेला सिगरेटचा धूर जेव्हा तुमच्या श्वासावाटे आत उतरतो तेव्हा आपले मन खोलवर जाळत नेतो. सिगरेट प्यायल्यावर एक प्रकारची वेगळीच धुंदी चढते, सिगारेट ची किक बसल्यावर सर्व काही शांत होऊन जाते. मी असे कधीच अनुभवले नव्हते. पण आज याची मला जाणीव झाली. मी असे का बोलत आहे? मला तर फॅंड्री बद्दल बोलायचे आहे ना? पण मी फॅंड्री बद्दलच बोलत आहे !!! फॅंड्री संपला सर्व थिएटर रिकामे होत होते, पण मी तसाच बसून होतो. मला फॅंड्री ची किक बसली होती.


 

किशोर कदम सोडले तर एकही मोठा कलाकार नसूनही मोठा ठरलेला चित्रपट म्हणजे फॅंड्री!!! जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट. वेळ जात जाते चित्रपट उलगडत जातो आणि त्याच बरोबर तो तुमचे मन पोखरायला सुरुवात करतो. जात नाही ती जात असे म्हणतात, भारतातील कायदा सर्वांना समान आहे , एकाच नजरेतून बघणारा आहे परंतु माणसांचे काय? त्यांची मानसिकता कोण बदलणार? त्यांना कोण समजावणार? अनेक गोष्टींमध्ये आधुनिकतेची कास धरणारे आपण धर्माच्या आणि जातीच्या बाबतीत मागे का? माणसाकडे फक्त माणूस म्हणून कधी बघणार आपण? आणि अजून किती दिवस माणसाची त्याच्या जातीनुसार गणना करणार? जातीनुसार वागणूक देणार? आपण राहणीमानाच्या दृष्टीने पुढारलेले असू पण विचारांच्या दृष्टीने किती दिवस मागासलेले राहणार? चित्रपट बघताना असे असंख्य प्रश्न पाठ सोडत नाहीत.


 

सोलापूर जवळील गावातील डुक्कर पकडणाऱ्या जब्या आणि त्याच्या कुटुंबाची, किशोर वयातील नाजूक प्रेमबंधाची, माणसांच्या मानसिकतेची आणि २१ व्या शतकातील मागासलेपणाची ही गोष्ट. नागराज ने व्यावसायिक दृष्टीने विचार करून केलेला हा चित्रपट नाही, त्यामुळे लोकांना कसा आवडेल याचा विचार न करता त्याला काय सांगायचे आहे ते त्याने यात मांडले आहे. नागराज मंजुळे ने नेहमीच्या चित्रपटांच्या धाटणीला शह देत एक वेगळीच कलाकृती आपल्यासमोर सादर केली आहे. चित्रपटाचा नायक रुबाबदार, देखणा, गोरा असावा या संकल्पनेला तडा देत जांबुवंत माने आपल्यासमोर उभा राहतो, घरची हलाखीची परिस्थिती, हातावर पोट असणारे आई बाबा, बहिणी आणि जन्मापासून चिकटलेली खालची जात, चित्रपटात नायकाबरोबर प्रवास करताना दिसतात. मागासलेल्या जातीतील मुलांना शाळेत घेतल्यावर , शिकायला दिल्यावर त्यांचे प्रश्न सुटतील, परिस्थिती बदलेल.. असे नाही तर, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. मागासलेली जात असली तरी तो सर्वांसारखाच एक माणूस आहे हे समाज विसरून जातो. आतापर्यंत त्यांनी खालच्या दर्जाची कामे केली त्यामुळे तसे पुढेही करायला हवे असे बंधनकारक नाही , त्यांनाही भावना आहेत , त्यांचीही स्वप्न असतात आणि याचे नेतृत्व करताना आपल्याला जब्या दिसतो. त्यांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुटत असतो परंतु त्याचे झाडात रुपांतर होण्यापूर्वीच जातीव्यवस्था त्याला मारून टाकते, माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्ती यामध्ये उलगडताना दिसून आल्या आहेत. स्पृश्य अस्पृश्य यावर भाष्य करताना चिमणीचे उदाहरण देणारी आजी, जादू टोणा, काळी जादू यांच्यावर विश्वास असणारा चंक्या, स्पृश्य, अस्पृश्यतेचे प्रतिक असणारा डुक्कर. आणि या डुकरावरूनच नाव पडलेला चित्रपट म्हणजे फॅंड्री.


 

चित्रपटाची कथा , पात्रांबद्दल बोलण्यापेक्षा स्वतः त्यांना अनुभवणे हि स्वतःच स्वतःला दिलेली एक उत्तम भेट असेल, त्यामुळे कथेवर आणि पात्रांवर मी भाष्य करणार नाही, चित्रपट बघतानाच ती उलगडत गेलेली चांगली आणि दिग्दर्शकानेही असाच विचार केला आहे. काय चूक काय बरोबर हे तो सांगत बसला नाही, चित्रपट बघायला येणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा विचार करायचा आहे, आतापर्यंत बघितलेल्या शेवटा पैकी या चित्रपटाचा शेवट सर्वोत्कृष्ट आहे. कदाचित चित्रपटाचा शेवट अनाकलनीय किंवा तडकाफडकी संपलेला वाटू शकतो परंतु विचार केल्यावर सहज लक्षात येईल कि नायकाने मारलेला शेवटचा दगड हा संपूर्ण समाजव्यवस्थेवर मारलेला तडाखा आहे. आणि शेवट हा विचार करायला लावणाराच असला पाहिजे. चित्रपटातील अनेक संवादांमधून दृश्यांमधून अंगावर काटा येतो. चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो. चित्रपटाचा विषय हाच चित्रपटाचा मूळ गाभा आहे, याच विषयाने चित्रपटातील पात्रांना, पटकथेला, संवादाला घटत पकडून ठेवले आहे त्यामुळे चित्रपट कुठेही भरकटत नाही. प्रत्येकाला प्रेम करण्याचा, आपल्या स्वप्नांचा विचार करण्याचा आणि त्यांना जगण्याचा अधिकार आहे. चित्रपटातील मुलीच्या लग्नाची काळजी करणारा, त्यासाठी तडजोड करणारा अशिक्षित बाप साकारताना किशोर कदमांनी त्या भूमिकेमध्ये प्राण ओतला आहे. अनेक दृश्यांमधून दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते परिणामकारकरित्या दिसून येते . जसे जत्रेच्या मिरवणुकीच्या वेळी चंक्या जब्याला खांद्यावर उचलून नाचत असतो, तेव्हड्यात त्याचे वडील तेथे येतात आणि पैशांची गरज असल्यामुळे, जब्याला डोक्यावर गॅसबत्ती घेऊन उभे करतात, त्यावेळी आनंदातून दुखांच्या अश्रूंमध्ये झालेले जब्याचे रुपांतर, मन हलवून टाकतो. जब्याच्या शाळेवर आंबेडकर, सावित्रीबाई फुले , शाहू महाराज यांची चित्रे रंगवलेली असतात परंतु त्याच्या शाळेतील मुलेच त्याच्या परिस्थितीवरून हसताना आणि डुकर पकडून नेताना त्या चित्रांसमोरून गेलेला कॅमेरा खूप काही सांगून जातो. सर्व पात्रांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. याची कथा फक्त तरूण वयातील प्रेमापुरतीच मर्यादित राहिलेली नसून खूप व्यापक अर्थाने ती आपल्या समोर येते. आपण शहरात राहतो, आधुनिक उपकरणे वापरतो, पण असे असूनही मानसिकता अजूनही बुरसटलेली कशी? अजून असे किती फॅंड्री निघाल्यावर आपले डोळे उघडणार याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.


Find out more: