
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत जगभरात लोकप्रिय असलेल्या बेअर ग्रील्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या टीव्ही सिरीयलसाठी झालेल्या जंगल शुटींगमुळे अधिक चर्चेत आला असतानाच याच शुटींग मुळे त्याच्यावर कदाचित तुरुंगवारी करण्याची वेळ येऊ शकते असे समजते. बॉलीवूड लाईफ डॉट कॉम वर या संदर्भात बातमी दिली गेली आहे.
या बातमीनुसार बेअर ग्रील्सचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा टीव्ही शो भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर बेअर ग्रील्सने त्याचे लक्ष फिल्म जगतातील ताऱ्यांवर वळविले आणि रजनीकांत याच्यासोबत मैसूर जवळच्या जंगलात या शोचे चित्रीकरण केले. त्यावेळी थलाईवा च्या धाडसाचे त्याच्या चाहत्यांनी मनापासून कौतुक केले पण या शुटींगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि रजनीकांत अडचणीत आला.
बेअर ग्रील्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड मध्ये आणीबाणीच्या किंवा अगदी अवघड परिस्थितीत त्यातही घनदाट जंगलात माणूस स्वतःला कसे सुरक्षित राखू शकतो हे दाखविले जाते. रजनीकांत सोबत ज्या जंगलात हे शुटींग झाले त्याविरुद्ध वनसंरक्षक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे जंगल राष्ट्रीय जंगल असून तेथे कोणत्याही प्रकारांचे शुटींग करता येणार नाही. यामुळे तेथील वनसंपदा आणि प्राण्यांना नुकसान होऊ शकते. रजनीकांत याच्याविरोधात तक्रार केली गेल्याने न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागेल आणि खरोखरच रजनीकांत दोषी ठरला तर त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते असे कायद्याचे जाणकार सांगत आहेत.