
दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. ओम राऊत यांनी हिंदीतील पदार्पणातच किमया करून दाखवली आणि बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ तुफान गाजला किंबहुना अजूनही गाजत आहे. आता ओम राऊतचा ‘तान्हाजी’नंतरचा पुढचा प्रोजेक्ट कोणता असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.
त्यातच आता प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. कारण ओम राऊत ‘तान्हाजी’नंतर एका अॅक्शनपटाचे दिग्दर्शन करणार असून ‘तान्हाजी’सारखाच हासुद्धा भव्यदिव्य चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजचे भुषण कुमार करणार आहेत.
या संदर्भातील माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. थ्रीडीमध्ये हा अॅक्शन-थ्रीलर चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये मुख्य भूमिका सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन साकारणार आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटाच्या निमित्ताने नेहमीपेक्षा अत्यंत वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता मोठ्या पडद्यावर ओम राऊत- कार्तिक आर्यन आणि भुषण कुमार हे त्रिकूट काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील इतर कलाकार याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.