‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्याचा आगामी चित्रपट येणार असून या चित्रपटाचे ‘लालसिंग चड्ढा’ असे नाव आहे. आमिरसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर-खान स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटातील आमिरचा फर्स्ट लूक काही दिवसापूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत करीनाचाही लूक रिलीज करण्यात आला आहे.
करीनाचा फर्स्ट लूक शेअर करत ही माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली. रिलीज झालेल्या फोटोमध्ये पंजाबी मुलीच्या रुपात करीना दिसत असून आमिरला तिने मिठी मारली आहे. परंतु आमिर यात पाठमोरा उभा आहे. विशेष म्हणजे करीना या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर पंजाबी मुलीची भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे.
करीनाचा ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज करण्यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. त्यानुसार या वर्षीच्या ख्रिसमसला हा चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटासाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.