बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती विविध ठिकाणी जाहीर सभांमधून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), एनपीआर आणि एनआरसी विरोधात वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिला एनआरसीवर प्रश्न विचारण्यात आला.

 

त्यावर तिने दिलेल्या उत्तरावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. आता स्वरा भास्कर पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कानपूरमध्ये वरिष्ठ वकील विजय बक्षी यांच्याकडून स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

वकील विजय बक्षी यांनी यूट्यूबवरील व्हिडिओंच्या आधारावर अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाची तक्रार केली आहे. स्वरा भास्करविरोधात कलम 124 अ, 153 अ, 153 ब आणि 505 (२) नुसार तक्रार केली आहे. कोर्टाने ही तक्रार दाखल करून घेत माझ्या फिर्यादीसाठी 20 मार्चची तारीख दिली असल्याची माहिती विजय बक्षी यांच्याकडून देण्यात आली आहे.

 

स्वरा भास्करविरोधात तक्रार देताना वकील विजय बक्षी म्हणाले की, स्वरा भास्कर ही दोन समाजांमध्ये फूट पाडण्यासाठी चिथावणीखोर भाषणं देत आहेत. यामुळे वाद निर्माण होत आहेत. मी ही तिचा एक व्हिडिओ बघितला. ज्यामुळे दिल्लीत दंगलीचं वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीतील हिंसाचारामध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आयपीचे अधिकारी अंकित शर्मां यांची हत्या झाली आहे. यासर्व कारणांमुळे स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाची तक्रार केली.                              

Find out more: