१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावणारे रियल लाईफ हिरो स्क़्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची आणि भुज मधील अगदी साध्या गृहिणी महिलांची कथा सांगणाऱ्या भुज द प्राईड या आगामी चित्रपटासाठी भारतीय हवाई दलाने पूर्ण सहकार्य केले आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कराने त्यांचे रणगाडे, शस्त्रे आणि खरे सैनिक पुरविले आहेत असे समजते. या चित्रपटाचे शुटींग राजस्तान मध्ये सुरु आहे.
१९७१ साली भारताच्या भूमीवर हल्ला चढविताना पाकिस्तानने सर्वप्रथम भुज या सीमेवरील गावातील हवाई दलाचा रनवे पूर्ण उध्वस्त करून टाकला होता. त्यामुळे येथून लढाऊ विमाने उडू शकत नव्हती आणि पाकिस्तानला आत घुसण्यापासून रोखायचे असेल तर हा रनवे दुरुस्त होणे भाग होते. त्यावेळी या स्टेशनचे प्रमुख स्क़्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांनी गावातील ३०० महिलांच्या मदतीने हा रनवे पूर्णपणे कार्यान्वित केला आणि येथूनच लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हल्ला परतवून लावला अशी ही कथा.
यात महत्वाचे योगदान दिले होते ते सुंदरबेन जेठा या महिलेने. तिच्यासह ३०० महिलांनी रात्रंदिवस काम करून ही धावपट्टी दुरुस्त केली होती, पैशाची कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त देशकार्याच्या भावनेतून. या चित्रपटात स्क़्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका अजय देवगण साकारत असून सुंदरबेनच्या भूमिकेत आहे सोनाक्षी सिन्हा. तिचे जवळच दुसऱ्या चित्रपटाचे शुटींग सुरु असून येण्या जाण्यात तिचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हवाई दलाने हेलिकॉप्टरची सोय केली आहे.
आर्मीने खरे रणगाडे, शस्त्रे आणि सैनिक पुरविले असून अन्य महत्वाच्या भूमिकात संजय दत्त, परिणीती चोप्रा, राणा दुगुबात्ती झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीवर १०० कोटींचा खर्च केला जात असून त्यात अजय देवगण यानेही पैसे गुंतविले आहेत.तो १४ ऑगस्ट २०२० ला प्रदर्शित होणार आहे.