दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापती आयकर विभागाच्या छापेमारीनंतर अनेक दिवसांपासून चर्चेत होता. विजयला कर चोरीच्या आरोपाखाली आणि निर्माता अनबूसोबतच्या व्यवहारांवर आयकर विभागाने समन्स पाठवले होते. पण आता अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आपले सर्व कर विजयने नियमितपणे भरले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात या सगळ्याची सुरुवात झाली. योग्य कर न भरल्याचा आरोप विजयवर करण्यात आल्यानंतर त्याच्या घरी आयकर विभागाने छापाही टाकला होता. विजयच्या राहत्या घरात त्यांना तब्बल ६५ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. ही सर्व रक्कम जप्त करण्यात आली. आयकर विभागाने याआधीही विजयच्या घरी छापा टाकला होता. अनेक खुलासे यावेळी करण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन चित्रपटांसाठी विजयने १३० कोटी रुपयांचे मानधन आकारले होते. त्याने एवढे मानधन बिगिल आणि मास्टर या दोन्ही चित्रपटांसाठी घेतले होते. बिगिल चित्रपटासाठी ५० कोटी तर मास्टर चित्रपटासाठी ८० कोटी रुपये आकारले होते. यासाठीचा संपूर्ण कर विजयने भरला होता.
बिगिल चित्रपटाच्या कलेक्शनमुळे या वादाची सुरुवात झाली. ३०० कोटींची कमाई या चित्रपटाने केली होती. आयकर विभागाने जेव्हा चित्रपटाचे निर्माते अनबू यांच्या घरी छापा मारला तेव्हा अधिकाऱ्यांना घरात ७७ कोटी रुपये मिळाले. अनबू यांनी या पैशांशी निगडीत कोणतेच कागदपत्र दाखवले नाही. यानंतरच या प्रकरणाने जोर धरला आणि विजयच्या घरी छापे टाकण्यात आले.